T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 85 3 outlets citing Entertainment IN

गणेश चतुर्थी 2026: चित्रपटांतील विशेष प्रवेश व उत्सवाची पद्धत

दैनिक प्रभात, पुडहरी आणि लोकसत्ता यांनी गणेश चतुर्थीच्या सणावर विविध पैलूंची माहिती दिली. काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये गणपतीचा विशेष प्रवेश दाखविला जात आहे, तर पुडहरी घरात मूर्ती ठेवण्यावर बंदी आणि पोर्तुगीजांच्या दहशतीखालील गोव्यातील पूजा पद्धतीवर प्रकाश टाकते. सर्वत्र सणाच्या विधी, शुभ मुहूर्त व नैवेद्याची माहिती दिली आहे.

First reported 1 day ago · latest update 6 hours ago
T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Loksatta Authority 85

Goa Ganesh Chaturthi History Portuguese: महाराष्ट्रातील गणेशोत्सव म्हणजे डोळ्यांसमोर उभे राहतात ते भव्य सार्वजनिक मंडप, मोठमोठ्या गणेशमूर्ती, देखावे, सामूहिक आरती आणि विसर्जनाच्या मिरवणुका. परंतु, महाराष्ट्राच्या अगदी शेजारी असलेल्या गोव्यात याच गणेशोत्सवाचे स्वरूप काहीसे वेगळे आहे. गोव्यात गणेश चतुर्थीला ‘चवथ’ किंवा ‘चोवथ’ म्हटले जाते. नोकरी-व्यवसायानिमित्त देश-विदेशात विखुरलेले गोमंतकीय चवथीला आपल्या मूळ गावी परततात. अनेक पिढ्या एका छताखाली एकत्र येतात. घरात गणपतीची प्रतिष्ठापना होते. ‘माटोळी’ बांधली जाते. तिच्यावर फळे, पाने, फुले, कंद, भाज्या आणि निसर्गातील विविध वस्तू सजवल्या जातात. काही कुटुंबांत मातीचा गणपती असतो; काही ठिकाणी मात्र कागदावर रंगवलेल्या गणपतीची किंवा कायमस्वरूपी लाकडी गणेशमूर्तीची पूजा करण्याची वेगळीच परंपरा दिसते आणि हीच बाब गोव्याच्या गणेशोत्सवाला वेगळेपण बहाल करते.

गोवा हा कोकणाला जोडून येणारा भाग. या दोन्ही प्रदेशातील पारंपरिक संस्कृतीत साम्य आढळत असले तरी साडेचारशे वर्षे राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांमुळे गोव्यातील अनेक परंपरांना वेगळे वळण मिळाले. हेच वळण गणेशोत्सवाच्या बाबतीतही दिसते.

गोव्यात पोर्तुगीज सत्ता

१५१० मध्ये अफोन्सो द अल्बुकर्कच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी गोव्याचा ताबा घेतला. मात्र आजचा संपूर्ण गोवा एकाच वेळी पोर्तुगीजांच्या नियंत्रणाखाली आला नव्हता. सुरुवातीला त्यांच्या ताब्यात आलेल्या तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी या प्रदेशांना पुढे ‘Old Conquests’ किंवा ‘Velhas Conquistas’ म्हटले गेले. अठराव्या शतकात पेडणे, डिचोली, सत्तरी, फोंडा, सांगे, केपे, काणकोण आदी अंतर्गत प्रदेश वेगवेगळ्या टप्प्यांत पोर्तुगीज सत्तेत समाविष्ट करण्यात आले. या नंतर मिळवलेल्या प्रदेशांना व्यापक अर्थाने ‘New Conquests’ म्हटले गेले. हा भौगोलिक फरक गोव्याचा धार्मिक इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. कारण पोर्तुगीजांचे हिंदू धर्माविषयीचे धोरण १५१० ते १९६१ या संपूर्ण काळात किंवा गोव्याच्या प्रत्येक भागात सारखे नव्हते. विशेषतः सोळाव्या शतकातील Old Conquestsमध्ये हिंदू धार्मिक संस्थांवर अत्यंत कठोर निर्बंध लादले गेले होते.

मूर्ती घरात ठेवण्यावरही बंदी?

पॉल ॲक्सेलरॉड आणि मिशेल ए. फुअर्च यांनी पोर्तुगीजकालीन अभिलेखांच्या (archival records) आधारे लिहिलेल्या ‘फ्लाइट ऑफ द डेअटीज: हिंदू रेझिस्टन्स इन पोर्तुगीज गोवा’ (Flight of the Deities: Hindu Resistance in Portuguese Goa) या शोधनिबंधात या धार्मिक धोरणाचे अनेक पुरावे दिले आहेत. त्यातील एक नोंद विशेष धक्कादायक आहे. २६ मार्च १५५९ रोजी घरात मूर्ती ठेवण्यास बंदी घालणारा कायदा करण्यात आल्याचा उल्लेख पोर्तुगीज अभिलेखांमध्ये आढळतो. यानंतर २० डिसेंबर १५६६ च्या आदेशानुसार नवीन मंदिरे बांधण्यावर तसेच अस्तित्वात असलेल्या मंदिरांच्या दुरुस्तीवर पूर्ण बंदी घालण्यात आली. १५८१ मध्ये धर्मगुरूंना स्थानिक हिंदूंच्या धार्मिक आचारांची माहिती गोळा करून ते रोखण्याचे निर्देश देण्यात आले. म्हणजेच हा संघर्ष केवळ एखाद्या मंदिराच्या वास्तू पुरता मर्यादित नव्हता, तर घरातील मूर्ती, सार्वजनिक धार्मिक आचार आणि धार्मिक संस्थांच्या अस्तित्वावरच नियंत्रण मिळवणारी व्यवस्था काही काळ 'ओल्ड कॉन्क्वेस्ट्स'मध्ये (Old Conquests) कार्यरत होती.

हेही वाचाबौद्ध साहित्यातील 'हत्थिवतिक' परंपरेचा गणेशाशी काय संबंध? अफगाणिस्तानातील नाणी कोणता इतिहास सांगतात?

याच सुमारास १५६०-६१ मध्ये 'गोवा इनक्विझिशन'ची (Goa Inquisition) औपचारिक स्थापना झाली. मात्र येथे एक फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. हिंदू धार्मिक आचारांवरील प्रत्येक बंदीला सरसकट 'इनक्विझिशनची बंदी' म्हणणे ऐतिहासिकदृष्ट्या अचूक ठरणार नाही. 'इनक्विझिशन' ही प्रामुख्याने धर्मांतरित ख्रिस्ती समाजातील कथित धर्मभ्रष्टता आणि प्रतिबंधित धार्मिक आचार तपासणारी न्यायिक संस्था होती; तर हिंदू मंदिरे, मूर्ती आणि धार्मिक व्यवहारांविरोधातील अनेक कायदे हे थेट पोर्तुगीज वसाहती प्रशासन आणि चर्चच्या व्यापक धर्मांतर धोरणाचा भाग होते.

मंदिरे पाडली; पण देव कुठे गेले?

या कालखंडात मंदिरं धोक्यात आली म्हणून अनेक ठिकाणी भक्तांनी मंदिरातील मुख्य मूर्ती किंवा देवतेचे प्रतीकच सुरक्षित प्रदेशात हलवले. पोर्तुगीजांच्या नियंत्रणाखालील प्रदेशातून अनेक देवता त्यांच्या सत्तेबाहेरील सुरक्षित भागात नेण्यात आल्या. आज फोंडा आणि परिसरात असलेल्या अनेक प्रसिद्ध गोमंतकीय देवस्थानांच्या इतिहासात अशा स्थलांतराच्या परंपरा आढळतात.

मंगेशीचे उदाहरण त्यासाठी महत्त्वाचे आहे. गोवा सरकारच्या नोंदीनुसार, श्री मंगेशाचे मूळ मंदिर कुशस्थळी म्हणजे आजच्या कुठ्ठाळी परिसरात होते. पोर्तुगीजांच्या धार्मिक कारवाईपासून देवतेचे रक्षण करण्यासाठी १५६० मध्ये शिवलिंग रात्रीच्या वेळी तेथून हलवून प्रियोळ येथे नेण्यात आले. त्या वेळी हा प्रदेश पोर्तुगीजांच्या नियंत्रणाबाहेर होता. रामनाथची देवताही लोटलीमधील मूळ मंदिरातून हलवून बांदिवडे येथे नेल्याची नोंद आहे. चोडण येथील देवकी-कृष्ण आणि इतर देवताही प्रथम मये आणि पुढे माशेल येथे हलवण्यात आल्या. शिवाय अनेक देवांचे स्थलांतर महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात झाल्याच्याही नोंदी आहेत.

गणपतीही गोव्यातून ‘स्थलांतरित’ झाला?

गोव्यातील मंदिरांच्या स्थलांतराच्या परंपरेचे एक अत्यंत महत्त्वाचे उदाहरण गणपतीशीच संबंधित आहे. 'आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ गोवा'च्या सरकारी नोंदींनुसार, महागणपती आणि महामाया या देवतांचे मूळ स्थान तिसवाडी तालुक्यातील प्राचीन एल्ला (Ella) परिसराशी संबंधित आहे. मध्ययुगीन राजकीय घडामोडींनंतर या देवता दिवाडी बेटावरील परिसरात पूजल्या जात होत्या. मात्र सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज मिशनऱ्यांच्या वाढत्या धार्मिक कारवाईमुळे मंदिर धोक्यात आले. त्यामुळे भक्तांनी या मूर्ती पोर्तुगीजांच्या नियंत्रणाबाहेरील सुरक्षित भागात हलवल्या. परंपरेनुसार, महागणपती आणि संबंधित देवता दिवाडीवरून प्रथम खांडेपार आणि पुढे फोंड्यातील खांडोळा येथे नेऊन प्रस्थापित करण्यात आल्या.

फोंडा: हिंदू धार्मिक भूगोलाचे मुख्य केंद्र

गोव्याचा धार्मिक इतिहास समजून घेण्यासाठी 'ओल्ड कॉन्क्वेस्ट्स' (Old Conquests) आणि 'न्यू कॉन्क्वेस्ट्स' (New Conquests) मधील फरक अत्यंत निर्णायक ठरतो. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांच्या ताब्यात आलेल्या तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी या भागांत आक्रमक धर्मांतर आणि मंदिरभंगाची कारवाई झाली. मात्र, पॉल ॲक्सेलरॉड आणि मिशेल फुअर्च यांच्या अभ्यासानुसार, फोंडा, सांगे, केपे, काणकोण, पेडणे, डिचोली आणि सत्तरीसारखे प्रदेश अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात विविध युद्धे, तह आणि राजकीय घडामोडींमधून टप्प्याटप्प्याने पोर्तुगीज सत्तेत आले. तोपर्यंत युरोप आणि पोर्तुगालमधील राजकीय वातावरण बदलले होते, धर्मांतराची आक्रमकता ओसरली होती आणि 'इनक्विझिशन'ची ताकदही उतरणीला लागली होती. त्यामुळे सोळाव्या शतकात जुन्या ताब्यातील प्रदेशात घडलेल्या कारवाईची पुनरावृत्ती अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात नव्या प्रदेशांमध्ये झाली नाही. याच कारणामुळे फोंडा हा परिसर गोव्याच्या हिंदू धार्मिक भूगोलाचे मुख्य केंद्र ठरला आणि आज तेथे मंगेशी, महालसा, शांतादुर्गा, रामनाथ, नागेश आणि महागणपती यांसारखी महत्त्वाची देवस्थाने एकवटलेली दिसतात.

हेही वाचाभारताआधीच आग्नेय आशियातील देशांमध्ये गणपती लोकप्रिय का झाला? तिथे गणपती कसा पोहोचला?

कागदावर चित्रित केलेल्या गणेशाची पूजा

आज बहुतेक घरांमध्ये मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जात असली, तरी काही गोमंतकीय कुटुंबांमध्ये मातीच्या मूर्तीऐवजी कागदावर चित्रित केलेल्या गणेशाची पूजा करण्याची, तर काही ठिकाणी कायमस्वरूपी लाकडी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आजही टिकून आहे. शिरोड्यातील नाईक वैद्य कुटुंबातील लाकडी गणपती पूजनाची परंपरा किमान तीन शतके जुनी असल्याचे स्थानिक कथनांनुसार मानले जाते. या तीनशे वर्षांच्या कौटुंबिक परंपरेचा वारसा जपत दरवर्षी चवथीला सुमारे ५० कुटुंबे एकत्र येऊन आपल्या मूळ वाड्यात श्रींची प्रतिष्ठापना करतात. काही स्थानिक कौटुंबिक कथनांनुसार, कागदी गणपतीची प्रथा पोर्तुगीजकालीन मूर्तिपूजेवरील निर्बंधांशी जोडली जाते. बंदीच्या काळात मातीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्याऐवजी कागदावर गणेशाचे चित्र काढून घर बंद करून त्याची पूजा केली जात असे.

गणपतीचे विसर्जनही रात्रीच्या अंधारात

पोर्तुगीज सत्तेच्या काळात गोव्यात हिंदू धार्मिक प्रथांवर कडक निर्बंध असल्याने, उपासनेसाठी स्थानिक पातळीवर अत्यंत प्रभावी आणि सूक्ष्म असे सांस्कृतिक प्रतिकाराचे (Cultural Resistance) मार्ग शोधले गेले. पॉल ॲक्सेलरॉड आणि मिशेल फुअर्च यांच्या 'फ्लाइट ऑफ द डेअटीज: हिंदू रेझिस्टन्स इन पोर्तुगीज गोवा' या शोध निबंधातील पोर्तुगीज अभिलेखांनुसार (archival records), उघडपणे पूजा करण्यास बंदी असल्याने स्थानिक हिंदू रात्रीच्या अंधारात गुप्तपणे धार्मिक उत्सव आणि विधी उरकून घेत असत. या ऐतिहासिक सत्याला समकालीन पुरावा म्हणून जेसुइट मिशनरी लुईस फ्रॉईश (Luís Fróis) यांची १५५९ ची नोंद अत्यंत मोलाची ठरते, ज्यामध्ये त्यांनी धार्मिक कारवाईच्या भीतीने गोव्यातील हिंदू आपले विवाह सोहळे रात्री १० ते ११ च्या सुमारास गुप्तपणे पार पाडत असल्याचे नमूद केले आहे. याच काळात पोर्तुगीजांच्या भीतीने लोक गणपतीचे विसर्जनही रात्रीच्या अंधारात करत असत.

कागदावरचा पेटीतला गणपती

पोर्तुगीजांच्या भीतीने गोव्यात मातीची गणेशमूर्ती आणणे किंवा तिचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करणे धोक्याचे ठरल्याने नवे मार्ग शोधले गेले. गोवा पर्यटन विभागाच्या नोंदीनुसार, पणजीतील प्रसिद्ध 'म्हमाई कामत' कुटुंबाने सार्वजनिकरीत्या पूजा करता येत नसल्याने लाकडी पेटीच्या (ट्रंकच्या) झाकणाच्या आतील बाजूस कागदावर काढलेले गणेशाचे चित्र ठेवून त्याची पूजा करण्याची अनोखी परंपरा विकसित केली. अधिकारी किंवा सैनिकांची तपासणी आल्यास ही पेटी सहज बंद केली जात असे. नदी जवळ असूनही मूर्ती किंवा चित्राचे सार्वजनिक विसर्जन करणे अशक्य असल्याने, हे कुटुंब पूजेतील तांदूळ, फळे आणि फुले एवढ्याच वस्तू जवळच्या विहिरीत अर्पण करत असे आणि कागदावरील गणपतीची ती प्रतिमा पुढील वर्षासाठी जतन करून ठेवत असे.

१९४६ : गोव्यातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव पिठाच्या गिरणीत

गोव्यात पोर्तुगीज राजवटीत सार्वजनिक गणेशोत्सव अजिबातच झाला नाही असे नाही. गोव्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात बार्देश तालुक्यातील पर्रा (Parra) या गावाला विशेष स्थान आहे. स्थानिक नोंदीनुसार, १९४६ मध्ये पर्रा येथे गोव्यातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाची वेळ अत्यंत ऐतिहासिक होती. १८ जून १९४६ रोजी डॉ. राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली गोवा मुक्तिसंग्रामाला नवी दिशा मिळाली होती. याच राजकीय व सामाजिक वातावरणात पर्रा गावातील तरुणांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि सामाजिक जागृतीसाठी हा उत्सव सुरू केला. विशेष म्हणजे, हा सुरुवातीचा सार्वजनिक उत्सव कोणत्याही भव्य मंदिरात किंवा मंडपात नसून एका पिठाच्या गिरणीत साजरा करण्यात आला होता.

पोर्तुगीज सत्तेच्या शेवटच्या काळात काय बदलले?

पोर्तुगीज राजवटीचा १५१० ते १९६१ हा साडेचारशे वर्षांचा काळ एकसंध मानणे ही मोठी ऐतिहासिक चूक ठरेल, कारण सोळाव्या शतकातील कठोर धार्मिक धोरण आणि विसाव्या शतकातील पोर्तुगीज गोवा यात मोठा फरक होता. अठराव्या-एकोणिसाव्या शतकाच्या संक्रमणकाळात 'इनक्विझिशन' संपुष्टात आले आणि धार्मिक नियंत्रणाच्या जुन्या पद्धती शिथिल झाल्यामुळे हिंदू मंदिरे पुन्हा बांधण्याची मुभा मिळू लागली; गोवा सरकारच्या नोंदीनुसार, पणजीतील श्री महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामाला १८१८ मध्ये पोर्तुगीज प्रशासनाने अधिकृत परवानगी दिली, जी अनेक शतकांनंतर 'ओल्ड कॉन्क्वेस्ट्स'मध्ये हिंदू मंदिरासाठी मिळालेली एक महत्त्वाची परवानगी मानली जाते.

↗ Read the original at Loksatta

Citations · 3 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

85 Loksatta ★ most authoritative citation

Ganesh Chaturthi 2026: घरात मूर्ती ठेवण्यावरच बंदी; मग पोर्तुगीजांच्या दहशतीखाली गोव्यात गणपतीची पूजा कशी केली गेली? - Loksatta

Ganesh Chaturthi 2026: घरात मूर्ती ठेवण्यावरच बंदी; मग पोर्तुगीजांच्या दहशतीखाली गोव्यात गणपतीची पूजा कशी केली गेली? Loksatta

6 hours ago
80 Google News Marathi Entertainment

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाची एंट्री आणि सिनेमात मोठा ट्विस्ट! या ४ बॉलिवूड चित्रपटांत उत्सव ठरला टर्निंग पॉइंट - Dainik Prabhat

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाची एंट्री आणि सिनेमात मोठा ट्विस्ट! या ४ बॉलिवूड चित्रपटांत उत्सव ठरला टर्निंग पॉइंट Dainik Prabhat

1 day ago
80 Pudhari

Ganesh Chaturthi 2026: गणपतीची स्थापना करताना 'हे' मंत्र नक्की म्हणा; शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि नैवेद्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या - Pudhari

Ganesh Chaturthi 2026: गणपतीची स्थापना करताना 'हे' मंत्र नक्की म्हणा; शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि नैवेद्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या Pudhari

1 day ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app